पुणे : कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे. साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, सोलापूर विभागातील २५ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील तीन कारखान्यांचे गाळप संपले आहे. महाराष्ट्रात एकूण ३३ साखर कारखाने बंद झाले आहेत.
चालू हंगामात कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. तर सोलापूर विभागात ९ मार्चअखेर सर्वाधिक ४१ साखर कारखान्यांनी गाळप केले.
महाराष्ट्रा यंदा मोठ्या संख्येने साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. साखर आयुक्तालयाकडील माहितीनुसार, ९ मार्चअखेर १८७ साखर कारखान्यांनी गाळप केले. राज्यात ८७६.३६ लाख टन उसाचे गाळप झाले असून साखरेचे उत्पादन ९०६.८९ लाख क्विंटल झाले आहे. राज्यात सरासरी साखर उतारा १०.३५ टक्के इतका आहे.