पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याने साखर कारखाने बंद होऊ लागले आहेत. साखर आयुक्तालयाकडून उपलब्ध झालेल्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील ८ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागात एकच साखर कारखाना बंद झाला आहे. महाराष्ट्रात एकूण ९ साखर कारखाने गाळप संपवून बंद झाले आहेत.
या हंगामात कोल्हापूर विभागात ३७ कारखान्यांकडून गाळप सुरू होते. तर सोलापूर विभागात २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सर्वाधिक ४१ साखर कारखान्यांनी गाळप केले.
महाराष्ट्रात मोठ्या संख्येने साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १८७ साखर कारखान्यांनी ऊसाचे गाळप केले. राज्यात ८१८.४८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून ८३९.८१ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.२६ टक्के इतका आहे.