गाळप हंगाम 2024-25 अंतिम टप्प्यात : महाराष्ट्रात केवळ 11 कारखान्यांमध्ये गाळप सुरु

पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 27 मार्च 2025 अखेर राज्यातील 200 पैकी 189 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. राज्यात सध्या केवळ 11 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु आहे. त्यामध्ये पुणे विभागातील 4, अहिल्यानगर विभागातील 2, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती विभागातील प्रत्येकी 1 आणि नागपूर विभागातील 2 साखर कारखाने सुरु आहेत.

कोल्हापूर, सोलापूर आणि अमरावती या विभागातील सर्व कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, 27 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील एकूण 189 साखर कारखान्यांनी कामकाज बंद केले आहे. यामध्ये सोलापूरमधील 45, कोल्हापूरमधील 40 कारखाने, पुण्यातील 27 कारखाने, नांदेडमधील 28 कारखाने, छत्रपती संभाजीनगरमधील 21 कारखाने, अहिल्यानगरमधील 24 कारखाने आणि अमरावती विभागातील 3 कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या हंगामात याच काळात राज्यात 154 कारखाने बंद झाले होते.

आतापर्यंत महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 800.61लाख क्विंटल झाले आहे. गेल्या हंगामातील समान कालावधीत उत्पादित झालेल्या 1077.48 लाख क्विंटलपेक्षा ते कमी आहे. 27 मार्चपर्यंत, राज्यातील कारखान्यांनी 846.06 लाख टन ऊस गाळप केले आहे, तर गेल्या हंगामात याच कालावधीत 1054.15 लाख टन ऊस गाळप झाला होता. राज्याचा एकूण साखर उतारा दर 9.46 टक्के आहे, जो गेल्या हंगामातील समान कालावधीमधील 10.22 टक्के उताऱ्यापेक्षा कमी आहे. उद्योग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कमी उत्पादन आणि वाढत्या गाळप क्षमतेमुळे या हंगामात कारखान्यांनी लवकर कामकाज बंद केले आहे. गाळप हंगाम सुरू होण्यास उशीर, इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर आणि कमी उत्पादन यामुळे राज्यात साखर उत्पादन गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here