हवाना (क्युबा) : चीनी मंडी
गेल्या दोन ऊस हंगामात खराब हवामानाचा फटका बसलेल्या क्युबामध्ये यंदा साखर उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा आहे. क्युबा सरकारच्या मंत्रालयातून याबाबत विश्वास व्यक्त करण्यात आला असला तरी, गेल्या दोन वर्षांतील उत्पादन आणि निर्यातीच्या तुलनेत ते कमीच असणार आहे.
क्युबाच्या अर्थ आणि नियोजन मंत्रालयाशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात यंदाच्या हंगामात १५ लाख टन साखर कच्च्या साखरेचे उत्पादन होण्याचे नियोजन आहे. त्यातून ९ लाख २० हजार टन साखर निर्यात करण्याची तयारी आहे.
क्युबामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गाळप हंगाम सुरू होतो. पण, कोरड्या आणि थंड हवामानामुळे जानेवारीमध्ये जवळपास ५० करखाने सुरू होता. मे महिन्यापर्यंत यांचा हंगाम चालतो. यावर्षी नोव्हेंबरमध्ये २० कारखाने सुरू झाले आहेत. तर या महिन्यात आणखी २५ कारखान्यांची भर पडत आहे.
या संदर्भात क्युबाचे अर्थमंत्री अलजेंड्रो गिल फर्नांडिस म्हणाले, ‘२०१७-१८च्या हंगामात उत्पादन ४३.७ टक्क्यांनी घटले. खराब हवामानाचा सर्वाधिक फटका बसला. पण, हे नुकसान भरून निघण्याची अपेक्षा आहे.’
क्युबा हा एकेकाळी मोठा निर्यातदार देश होता. इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार २०१६-१७च्या हंगामात क्युबामध्ये १८ लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यातील ११ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती.
क्युबामध्ये अपेक्षानुसार लक्ष्य अभावानेच साध्य होते. २०१७-१८चा हंगाम चांगला न गेल्यामुळं यंदाच्या हंगामासाठी क्युबाला जोर लावावा लागणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच क्युबाला फ्रान्सकडून शुद्ध प्रक्रियायुक्त साखर आयात करावी लागली. क्युबामध्ये रेशनच्या धर्तीवर प्रत्येक कुटुंबाला धान्य पुरवले जाते. ही गरज भागवण्यासाठी क्युबामध्ये साखर आयात करावी लागली होती.
क्युबाच्या बाजारपेठेचा विचार केला तर, त्यांना वर्षाला ६ ते ७ लाख टन साखरेची गरज आहे. तर चीनला ते करारानुसार वर्षाला ४ लाख टन साखर निर्यात करतात. उर्वरीत साखर ते खुल्या बाजारात विक्री करतात.