मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस लांबल्याने शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. अशातच कृषी विभाघ्ने राज्यातील पेरणीची आकडेवारी जाहीर केली आहे. राज्यात सध्या २०.६० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. पावसाअभावी अनेक जिल्ह्यात पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत. दुष्काळ निवारण सज्जता, खरीपाची कामे आणि केंद्र सरकारच्या कृषी विभागातील नवीन योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
जून महिन्यापासून आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण व्यवस्था, खरीपाच्या पेरण्यांची प्रगती आणि इतर कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण (विस्तार) विभागाचे सहसचिव सॅम्युअल प्रवीण आणि महाराष्ट्रातील कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या सह-अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली.
2022-23 या वर्षात, या योजने अंतर्गत १ लाख २७ हजार ६२७ पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. याचबरोबर १ लाख १२ हजार हेक्टरवरी जमीन सिंचनाखाली आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. जुलै महिन्यात राज्यात उच्चांकी पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. विशेष म्हणजे कोकण विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परंतु मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची समाधानकारक कामगिरी नसल्याचे सांगण्यात आले.