नवी दिल्ली : उद्योगांकडून सातत्याने मागणी असूनही, चालू हंगाम २०२३-२४ मध्ये साखर निर्यातीस परवानगी देण्याची शक्यता सोमवारी सरकारने नाकारली आहे. सद्यस्थितीत साखरेच्या निर्यातीवर बंदी आहे.तथापि, चालू हंगामात साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (आयएसएमए) ने सरकारला २०२३-२४ हंगामात १० लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याची विनंती केली आहे.
याबाबत ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, उद्योगाने मागणी केली असली तरी सध्या सरकार साखर निर्यातीचा विचार करत नाही. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी अधिक साखर वळवण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे.