सांगली : सध्या राज्यातील ऊसतोड मजुराना ३४ टक्के दरवाढ, तर मुकादमाना १ टक्का दरवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, ही वाढ अपुरी आहे. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतूकदारांना ५५ टक्के वाहतूक व कमिशन दरवाढ पंधरा दिवसात करावी, अन्यथा दोन्ही राज्यातील ऊस वाहतूकदार संपावर जातील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला.
सुकाणू समितीचे प्रमुख संदीप राजोबा यांनी सांगितले की, याविषयी येत्या आठ दिवसांमध्ये राजू शेट्टी व पृथ्वीराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय ऊस वाहतूकदारांचा मेळावा घेण्यात येणार आहे. साखर संघ व राज्य सरकार व साखर कारखानदारांकडे मागणी करणार आहे. येत्या पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतूक स्वयंस्फूर्तीने संपावर असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ऊसतोड मजुरांना ३४ टक्के दरवाढ केल्यामुळे प्रतिटन ३६६ रुपये झाले आहेत. त्याचबरोबर मुकादमास १ टक्के कमिशनमध्ये वाढ झाल्याने प्रतिटन ७३ रुपये मिळणार आहेत. वाढत्या महागाईमुळे ही वाढ अपुरी आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी केंपवाड कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी बंडू जगताप यांना दरवाढीचे निवेदन देण्यात आले. नागेश मोहिते, विठ्ठल पाटील, विनोद पाटील, संदीप मगदूम, श्रीकृष्ण पाटील, गणेश गावडे, पी. एम. पाटील, विजय पाटील, केतन मिठारी, बालाजी पाटील आदी उपस्थित होते.