पुणे : शेतकरी सभासदांचा ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेने जळीत करून आणल्यास तोडणी वाहतूक यंत्रणेच्या बिलातून प्रती टन २०० रुपये कपात केली जाईल, असा निर्णय बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या सहमतीने ऊस जाळून आणल्यास त्यांच्या ऊस बिलातून प्रती टन ५० रुपये कपात केले जाणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. सभासदांनी ऊस जाळून आणू नये, आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, कारखान्याकडे मुबलक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील आडसाली ७ लाख ६ हजार टन, पूर्व हंगामी १ लाख १३ हजार ३९५ टन, सुरू १३ हजार ९९५ टन, खोडवा ६५ हजार ४२६ टनांचे गाळप केले आहे. आजअखेर १२१ दिवसांत प्रती दिन ९ हजार टन ऊस गाळप केला आहे. आत्तापर्यंत एकूण १० लाख ८४ हजार २३३ टन उसाचे गाळप केले आहे. ११.७४ टक्के साखर उतारा राखत १२ लाख ६७ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. ऊस तोडणी करताना मजुरांकडून पैशाची मागणी केली जात असल्यास लेखी तक्रार शेतकऱ्यांनी द्यावी. चौकशी करून यंत्रणेने घेतलेल्या पैशांची कपात त्यांच्या ऊस तोडणी वाहतूक बिलातून करण्यात येईल.