अहमदनगर : गेल्यावर्षी उसाची टंचाई निर्माण झाल्याने साखर कारखान्यांना एक महिना आधीच हंगाम आटोपते घ्यावे लागले होते. यंदा नगर विभागात अतिशय बिकट स्थिती आहे. कमी ऊस लागवड, दुष्काळसदृश स्थिती असल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे साखर कारखानदार धास्तावले आहेत.
गेल्यावर्षी नगर जिल्ह्यात १ लाख ६० हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली होती. यंदा फक्त १ लाख ९ हजार ४५७ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. जवळपास ५० हजार हेक्टरची घट दिसून आली आहे. ११ हजार ९११ हेक्टरवर नव्याने ऊस लागवड झाली असून ५६ हजार हेक्टर खोडवा उसाचे क्षेत्र आहे. दुष्काळी स्थितीमुळे खोडवा उसालाही पाण्याची चिंता आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने अनेक शेतकरी चाऱ्यासाठी ऊस विकत आहेत. त्यामुळे कारखानदार धास्तावले आहेत.
यंदा ऊस टंचाईमुळे तीन महिनेही हंगाम चालणे मुश्कील आहे. पावसाअभावी उसाची हवी तेवढी वाढ झालेली नाही. ऊस पूर्ण वाढला असेल तरच त्याचे वजन, उतारा चांगला येतो. चार महिने हंगाम चालला तर कारखान्यांना फायदा होतो. जिल्ह्यात आता पावसाला सुरुवात झाली असली तरी तो पुरेसा नाही. परतीच्या पावसावरच नव्या ऊस लागवडीचे गणित अवलंबून असेल.