नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. कधीही युद्ध सुरु होईल, अशी परिस्थिती असताना पाकिस्तानने भारतावर सायबर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारतीय लष्कराचे संकेतस्थळ हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने मागच्या दोन दिवसांत दोन वेळा भारतीय लष्कराच्या वेबसाईटवर सायबर हल्ला करून वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या टेक तज्ज्ञांनी हे हल्ले हाणून पडत त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत.
भारताने काही पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा एम. आसिफ यांच्या एक्स अकाऊंटला भारतामध्ये ब्लॉक केले आहे. जम्मू काश्मीरबाबत चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्याने तसेच भारतामध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
“आयओके हॅकर” – इंटरनेट ऑफ खिलाफत या टोपणनावाने कार्यरत असलेल्या गटाने पृष्ठे खराब करण्याचा, ऑनलाइन सेवांमध्ये व्यत्यय आणण्याचा आणि वैयक्तिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. भारतातील सायबरसुरक्षा तज्ञांनी हे हल्ले ओळखले आणि त्यांचे मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे त्वरीत शोधून काढले. आर्मी वेल्फेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशन (AWHO) च्या डेटाबेसमध्येही घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे आढळून आले. २२ एप्रिल रोजी फालगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी कारवाया तीव्र केल्या असतानाही नियंत्रण रेषेवर तणाव कायम आहे.