नवी दिल्ली : सध्या मोचा चक्रीवादळाने सर्वत्र थैमान घातला आहे. म्यानमारच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ आले आहे. वादळाच्या तडाख्यात सापडलेली घरे उद्ध्वस्त झाली असून किमान तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी लोकांनी रविवारपासून मठ, पॅगोडा आणि शाळांमध्ये आसरा घेतला. म्यानमारच्या हवामान विभागाने सांगितले की, रविवारी दुपारी रखाईन राज्यातील सितवे विभागात २०९ किमी प्रती तास वेगाने वारे वाहत होते. वादळ बांगलादेशातील सेंट मार्टिन द्विपकल्पाजवळून गेले आहे. त्यामुळे मोठी हानी झाली आहे.
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, चक्रीवादळामुळे पहिल्या दिवशीच जोरदार वारे वाहिले. त्यात अनेक मोबाईल टॉवर उद्ध्वस्त झाले. बहुतांश विभागांचा संपर्क सुटला असून चक्रीवादळाच्या प्रभावाने पाऊस कोसळला आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. म्यानमार आणि बांगलादेशात अशी स्थिती असून लोक घरांमध्ये अडकले आहेत. सितवे, कौकफ्यू, ग्वा या विभागातील घरे, विजेचे ट्रान्सफॉर्मर, मोबाईल, टॉवर, बोटी आणि पथदिव्यांचे मोठे नुकसान झाले आहे, वादळामुळे यांगून शहरापासून जवळपास ४२५ किमीवरील दक्षिण-पश्चिमेकडील कोको द्विपकल्पावर मोठे नुकसान झाले आहे.
म्यानमारमध्ये सितवे विभागात ४,००० लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर बांगलादेशात धोका तुलनेने कमी असल्याचे हवामान शास्त्र विभागाचे संचालक अजीजूर रहमान यांनी सांगितले. वादळ दुपारपर्यंत पूर्वेकडे वळल्याने नुकसान कमी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हे चक्रीवादळ भारतासाठी धोकादायक असल्याचे म्हटले जाते. पुरबा मेदिनीपूर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला असून एनडीआरएफची पथकेही सज्ज करण्यात आली आहेत.