कोल्हापूर : असळज (ता. गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने १६ ते ३१ डिसेंबर २०२३ या चौथ्या पंधरवड्याचे २५ कोटी ४२ लाख रुपयांचे ऊस बिल शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. चालू गळीत हंगामात डिसेंबरअखेरची बिले देण्यात आली आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी दिली. चालू हंगामात ५.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले.
आमदार पाटील म्हणाले कि, कारखान्याने या पंधरवड्यात गाळप केलेल्या ७९ हजार ४५५ मे. टन उसाचे ३२०० रुपयांप्रमाणे होणारे बिल आदा केले आहे. कारखान्याने २८ जानेवारीअखेर ३ लाख ९० हजार ४५० मे. टन उसाचे गाळप करून ३ लाख ९९ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचा डिस्टिलरी व को-जनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. गाळप उद्दिष्ट पूर्ततेसाठी कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी पिकवलेला ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, सर्व कर्मचारी उपस्थित होते.