सोलापूर : संत दामाजी साखर कारखान्यात ऑफ सिझनमधील कामे पूर्णत्वास येत आहेत. आगामी गळीत हंगामामध्ये एकूण पाच लाख टनाचे गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. व्हाईस चेअरमन तानाजी खरात व संचालक मंडळातील सहकाऱ्यांच्या सहकार्याने शासनाने दिलेल्या परवानगीचे तारखेपासून कारखाना सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी विधिवत मिल रोलर पूजन त्यांच्या हस्ते झाले.
चेअरमन पाटील म्हणाले, मागील हंगामातील ऊस बिले, वाहतूक बिले, कर्मचारी पगार वेळेत देण्याचे काम या संचालक मंडळाने केले आहे. नव्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरलेली आहे. यावर्षी पाऊस चांगला झालेने उसाची वाढ चांगली झालेली आहे. त्यामुळे येणारा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालणार आहे. यावेळी संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे आदींसह संचालक, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.