कोल्हापूर : हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या अथर्व इंटरट्रेड कंपनीने नुकतीच युनियनबरोबर चर्चा न करता १५०० रुपयांची पगार वाढ केली. ही पगारवाढ युनियनला मान्य नाही. आमच्या अन्य मागण्या प्रलंबित आहेत. त्यासह करारानुसार ५० टक्के वेतनवाढ करावी, अशी मागणी युनियनने केली आहे. याबाबत चंदगड तालुका साखर कामगार युनियन सिटू संघटनेने निवेदन दिले आहे. कंपनीने गेल्या पाच वर्षांत कामगारांना किमान वेतन दिलेले नाही. नियमानुसार महागाई भत्ता, बोनस दिला जात नाही. कामगार पदाधिकाऱ्यांच्या आकसाने बदल्या केल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि,अथर्व ट्रेडर्सने निवृत्त कामगारांना कायदेशीर देणी वेळेवर दिलेली नाहीत. हंगामी कामगारांना सेवेत कायम केलेले नाही. न्यायालयीन निर्णयांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जाते. बोनस, अनियमित पगार, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष, कामगारांच्या बदलीचा प्रश्न, युनियनबरोबर मागण्यांबाबत अधिकृतपणे चर्चा करण्यास टाळाटाळ केली जाते, असेही निवेदनात म्हटले आहे. ‘सीटू’चे अध्यक्ष प्रा. सुभाष जाधव, कॉ. प्रा. आबासाहेब चौगुले, प्रदीप पवार, महादेव फाटक आदींसह कामगारांच्या निवेदनावर सह्या आहेत.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.