पुणे : आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याने नवीन गळती हंगाम २०२४-२५ साठी ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. कारखान्यातर्फे उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्यामार्फत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. ठिबक सिंचन, ऊस रोपे पुरवठा, सबसॉयलरची उपलब्धता, आंतर मशागतीसाठी लहान ट्रॅक्टरचे वाटप, शेतकरी सहली, हिरवळीची खते, बायोकंपोस्ट खत, माती, पाणी परीक्षण, रासायनिक खते, जैविक खते, औषधे अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी केले.
संचालक जगदाळे यांनी सांगितले की, नव्या ऊस लागवड धोरणानुसार, शेतकऱ्यांनी १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आडसाली उसाची लागवड करावी. यामध्ये उसाच्या को-८६०३२, कोएम-२६५, फुले १५०२२ या उसाच्या जाती लावाव्यात. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत को ८६०३२, कोएम २६५, व्हीएसआय ८००५, कोसी ६७१, फुले ऊस १५०१२ कोव्हीएसआय १८१२१ या ऊसाच्या प्रजाती लावाव्यात. तर चालू उसाची लागवड १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत करावी. खोडवा ऊसात २८ फेब्रुवारी २०२५ अखेर तुटलेला उसाचा समावेश असून यामध्ये वरील सर्व ऊस जातीचा राहील असे कळविण्यात आले आहे.