कोल्हापूर:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी
आंदोलन सुरू केले.गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ)येथून त्यांनी वसंतराव नाईक कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केली.यावेळी ‘स्वाभिमानी’चे डॉ. प्रकाश पोपळे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले, वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक, ‘स्वाभिमानी’चे विदर्भ प्रवक्ता मनीष जाधव, हणमंत राजुगोरे, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, गहुलीचे सरपंच नितीन कोल्हे, उपसरपंच विलास आडे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेऊन ते अर्ज राष्ट्रपतींना दिले जाणार आहेत.त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या जाणार आहेत, असे ‘स्वाभिमानी’ने यावेळी जाहीर केले.
याबाबत ‘स्वाभिमानी’ने सांगितले की, वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेले दर, शेतीमालाचे चुकीचे आयात-निर्यात धोरण, जीएसटीचा पडलेला बोजा, यामुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतीतून लोक बाहेर पडू लागले आहेत.केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात जाऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी आमची मागणी आहे.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी राजू शेट्टी यांची भेट घेतली.आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहभागी व्हावे, यासाठी वंचितने प्रयत्न चालवले आहेत.