बुढाना : थकीत ऊस बिलांची मागणी करत धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी भैसानाच्या बजाज शुगर मिलला आता ऊस देणार नसल्याचे सांगितले. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस इतर साखर कारखान्यांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रशासनाला जिल्हा ऊस अधिकारी आणि ऊस समिती सचिवांच्या मध्यस्थीने ऊस बिलांची यादी दिली होती. मात्र बिले मिळालेली नाहीत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढून बुढाणा येथील कारखान्यावर पंचायत आयोजित करतील अशी घोषणा भाकियुने केली आहे. गेल्या ६५ दिवसांपासून शेतकरी व भाकियूचे कार्यकर्ते, कामगार बजाज शुगर मिल भैसानाच्या मुख्य गेटवर धरणे आंदोलन करीत बसले आहेत. पैसे थकीत असल्याने संतप्त झालेल्या भाकियुच्या नेत्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी अरुण कुमार यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोहोचून चर्चा केली. भाकियूचे तालुका अध्यक्ष अनुज बालियान आणि विभाग अध्यक्ष संजीव पनवार यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, २३ जून रोजी शासनाने जिल्हा ऊस अधिकारी आणि शेतकऱ्यांना थकीत बिलांची यादी दिली होती.
कारखान्याकडून थकीत बिले मिळावीत, ऊस दुसर्या कारखान्याला पुरविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी विकास त्यागी, धीर सिंग, इसरार, प्रवीण कुमार, बीर सिंग, राजबीर, किशन दत्त, तमसीर राणा, लविश, कृष्णा दत्त, वीरेंद्र आणि सुधीर सेहरावत उपस्थित होते.