कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या आंदोलनामुळे अपेक्षित ऊस पुरवठा होत नाही. त्यामुळे शनिवार, दि. १८ नोव्हेंबरपासून पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले – पोर्ले येथील श्री दत्त दालमिया साखर कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मंगळवारी आसुर्ले-पोर्ले परिसरातील शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी, ग्रामस्थांनी जिल्ह्यात चालू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराबाबत आंदोलनानंतर कारखाना प्रशासनाला ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची मागणी केली होती. याबाबत कारखान्याला निवेदन दिले होते.
या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासनाने गाळप बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे. याबाबत दालमिया प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कारखान्यातील शुगर आणि को-जन. विभागातील सर्व कायम व हंगामी डेलीवेजीस, आयपीएस, तसेच सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपेक्षित ऊस पुरवठा होत नसल्यामुळे दि. १८ पासून पुढील आदेश होईपर्यंत कामावर ब्रेक दिला आहे. तथापि, अत्यावश्यक सेवा व सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम चालू राहील, असे पत्रकात म्हटले आहे.