कोल्हापूर : राज्य सरकारने तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागात दुष्काळ जाहीर करावा आणि बँकांनी पीक कर्जाची वसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. राज्यातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्यांची मागणीही त्यांनी केली आहे. शेट्टी यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या माध्यमातून सरकारला पत्र पाठवले आहे.
‘चिनीमंडी’शी बोलताना शेट्टी म्हणाले की, राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचा अधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने लवकरात लवकर पावले उचलावीत. शेतकऱ्यांच्या सर्व आशा संपल्या आहेत. अधिकारी वीज कनेक्शन कापून त्यांना त्रास देत आहेत. त्यांना कर्ज फेडण्यास भाग पाडले जात आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. दुष्काळी स्थितीचा महिलांनाही त्रास होत आहे. असेच सुरू राहिल्यास दुष्काळी भागातील शेतकरी रस्त्यावर उतरतील. कर्जमाफी झाली नाही तर खरीप हंगामासाठी शेतकरी दुसरे पीक कर्ज घेऊ शकणार नाहीत, असेही शेट्टी म्हणाले. सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडे वळण्यास भाग पडत आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या वाढतील. आधीच पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांची पिके हातची गेली असून उत्पन्नही किरकोळ झाले आहे, असे शेट्टी म्हणाले.