लखनऊ: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. देशभरात ३० एप्रिल २०२१ अखेर १०६ साखर कारखाने सुरू असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली. देशाच चालू हंगामात उच्चांकी स्तरावर साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये साखर उत्पादनात घट नोंदविण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांनी ३० एप्रिलअखेर १०५.६२ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत झालेल्या ११६.५२ लाख टनाच्या तुलनेत हे १०.९० लाख टनाने कमी आहे. यावर्षी सुरू झालेल्या १२० पैकी ७५ साखर कारखान्यांनी गाळप संपुष्टात आणले आहे. अद्याप ४५ कारखाने सुरू आहेत. चालू हंगामातील बहुतांश कारखाने पुढील पंधरवड्यात बंद होतील अशी शक्यता आहे. काही कारखाने महिना अखेरपर्यंत सुरू राहतील.
महाराष्ट्रात चालू हंगामात साखर उत्पादनात वाढ झाली आहे. राज्यात ३० एप्रिलअखेर १०५.६३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ६०.९५ लाख टन उत्पादन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत ४४.६८ लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.