हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नगर : चीनीमंडी
नगर जिल्ह्यात यंदा नुकत्याच संपलेल्या साखर हंगामात सरासरी साखर उतारा गेल्या वर्षाइतकाच, ११ टक्के राहिला आहे. सहकारी कारखान्यांचा साखर उतारा यावर्षीही जास्त राहिला. मात्र, खासगी कारखान्यांचा उतारा कमीच राहिल्याने शेतकऱ्यांना एफआरपीला याचा फटका बसणार आहे. तर, गेल्या वर्षाच्या तुलनेत काही साखर कारखान्यांचा साखर उतारा यंदा जास्त आहे.
शेतकऱ्यांना उसाचे किमान समान मूल्य (एफआरपी) मिळावे यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने मानके निश्चित केली आहेत. यानुसार दहा टक्के साखर उतारा असेल तर त्यासाठी प्रतिक्विंटल २७५० रुपये एफआरपी देण्याची शिफारस केली आहे. त्यानंतरच्या टक्केवारीनुसार एफआरपीत पावणेतीनशे रुपयांची वाढ केली जाते. जर साखरेचा उतारा दहा टक्क्यांपेक्षा जास्त राहिला तर कारखान्यांकडील एफआरपीच्या रक्कमेत वाढ होते. मात्र कमी साखर उतारा असेल तर कारखान्यांसह शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसतो.
गेल्या वर्षी शेतकरी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कमी उतारा असलेल्या साखर कारखान्यांवर आक्षेप नोंदवला होता. उतारा कमी दाखवून ऊस उत्पादकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप केला गेला. त्यातही खासगी साखर कारखान्यांवर शेतकरी संघटनांचा आक्षेप राहिला. याबाबत काही कारखान्यांकडून मशिनरी जुनी असल्याचे कारण देण्यात आले होते. यावर्षी उसाचे उत्पादन जास्त असल्याने साखरेचे गाळपही जास्त झाले आहे. गेल्या हंगामात १ कोटी ५१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. तर यंदा सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी १ कोटी ४९ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
गेल्या वर्षी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ११ टक्के होता. यंदा त्यात .०४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र सहकारी कारखान्यांचा साखर उतारा ११.१४ टक्के तर खासगी कारखान्यांचा उतारा १०.८० टक्के इतका आहे. संगमनेरमधील थोरात सहकारी कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक म्हणजे ११.८३ टक्के आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उताऱ्यात वाढ झाली आहे. डॉ. बा. बा. तनपुरे कारखान्याचा साखर उतारा ११. ७४ टक्के आहे. तर प्रवरा कारखान्याचा साखर उतारा कमी आहे. यंदा कारखान्याचा उतारा ११ टक्के आहे. गेल्यावर्षीपेक्षा यात एक टक्क्याची घट झाली आहे.
खासगी कारखान्यांमध्ये अंबालिका कारखान्याचा साखर उतारा ११.३३ टक्के आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात घट झाली आहे. साईकृपा कारखान्याचा साखर उतारा सर्वात कमी आठ टक्के आहे. दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई यामुळे साखर उताऱ्याला फटका बसल्याचे सांगण्यात येते. कमी साखर उतारा असलेल्या कारखान्यांना पुढील हंगामात एफआरपी ठरविताना अडचण होणार आहे. शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.