सांगली : वाळवा तालुक्यात यंदा ऊस क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२३-२०२४ या हंगामासाठी तालुक्यात उसाचे एकूण क्षेत्र ३५ हजार ८५ हेक्टर आहे. कमी पावसामुळे तालुक्यात १४ हजार ९४५ हेक्टर इतकीच आडसाली उसाची लागण झाली आहे. वाळवा तालुक्यात गेल्या तीन महिन्यात सरासरी ५३ टक्के पाऊस झाला आहे. कमी पावसाचा थेट परिणाम उसासह अन्य पिकांच्या वाढीवर झाला आहे.
तालुक्यात पुरेसा पाऊस न पडल्याने पाझर तलाव, बंधारे अजून कोरडे आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून विजेचे वेळापत्रक कोलमडले आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना कसतरत करावी लागत आहे. उपसाबंदीची टांगती तलवार आहे. पावसाने मारलेली दडी आणि पिकाची खुंटलेली वाढ लक्षात घेता आगामी हंगामात ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे.