पुणे : यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. विशेषतः पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर या ऊस पट्ट्यात आतापासूनच कमी पर्जन्यमानाचे परिणाम जाणवू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात फक्त ७२ टक्के पेरणी झाली आहे. पावसाअभावी तालुक्यातील तब्बल ५,५००.१ हेक्टर क्षेत्र पेरणी शिवाय रिकामे राहिले आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिकेही कोमेजू लागली आहेत. दुबार पेरणी केलेले शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पिकांच्या वाढीला ओल नसल्याने सुमारे ८० टक्के पिकांनी माना टाकल्या आहेत. ऊस लागवड क्षेत्रातही तब्बल ३० टक्के घट झाल्याचे चित्र आहे.
‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, पुरंदर तालुक्यात सरासरी २,६२२.६० हेक्टरवर ऊस क्षेत्र आहे. मात्र पावसाअभावी ६९.१३ टक्के क्षेत्रावर म्हणजे १,८१२.९० हेक्टर क्षेत्रातच ऊस पिक आहे. ऊस लागवड क्षेत्रात ३०.८७ टक्के घट झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात सासवड विभाग वगळता बाकी सहाही कृषी मंडलांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. पुरंदरमध्ये खरीप हंगाातील १९ हजार २१९ हेक्टर क्षेत्रापैकी तालुक्यात १३ हजार ७१९ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. जवळपास २८ टक्के क्षेत्र पेरणीविना राहिले. शेतकऱ्यांनी शासकीय, खासगी बियाणे, खते विक्री केंद्रांतून महागड्या दराने बियाणे खरेदी केले आहे. आता पाऊस न पडल्यास हा खर्च वाया जाण्याची भीती आहे.
तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव ‘ॲग्रोवन’शी बोलताना म्हणाले की, पावसाने दडी मारल्याने चिंतेची स्थिती आहे. मात्र, अजूनही चांगला पाऊस झाला, तर संकरित बाजरी, सूर्यफूल, तीळ, तूर, धने आदी पिके घेता येतील. २० सप्टेंबरनंतर रब्बी ज्वारी, करडई, सूर्यफूल घेऊ शकतात, अशी शिफारस कृषी विभागाने केली आहे.