बँकॉक : जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश असलेल्या थायलंडमध्ये साखरेच्या उत्पादनात दर वर्षी घट होताना पहायला मिळत आहे. येत्या ऊस हंगामात थायलंडमध्ये १३० लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ७ टक्क्यांनी घट दिसत आहे. थायलंडच्या ऊस आणि साखर मंडळाने ही माहिती दिली. पावसाचे घटलेले प्रमाण आणि त्यामुळे एकरी उसावर झालेला परिणाम यामुळे साखर उत्पादन घटत आहे. २०१९-२० च्या हंगामात साखरचे उत्पादन घटण्याची शक्यता दिसत असून, ८ टक्क्यांची घसरण होऊन १२० लाख टन उत्पादन होईल, असे मत ऊस आणि साखर महामंडळाचे सरचिटणीस वरावन चितारून यांनी व्यक्त केले आहे.
चितारून म्हणाले, ‘दुष्काळ सदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर ऊस आणि पर्यायाने साखरेच्या उत्पादनात घट दिसत आहे. पण, पुरेसा पाऊस झाला तर यात वाढ होण्याची शक्यता आहे. उसाच्या क्षेत्रातही घट झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांत उसाला चांगला दर मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांनी उसाऐवजी इतर पिके घेण्यास सुरुवात केली आहे.’
थायलंडमध्ये २०१८-१९ च्या वर्षात १४० लाख टन शुद्ध साखरेचे उत्पादन झाले. उसाला पुढच्या हंगामात टनाला २२.७३ डॉलर दर मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दशकांतील हा निचांकी दर आहे. त्यामुळे भविष्यातही शेतकरी उसापासून दूर पळणार आहेत. या किमतीचे गणित हे अपेक्षित निर्यातीवरून काढण्यात आले आहे. सध्या थायलंडचे चलन बाहत डॉलरच्या तुलनेत मजबूत होत आहे. त्याचा परिणाम साखर उद्योगावर होताना दिसत आहे. कारण, स्थानिक चलन बळकट झाल्यास, निर्यातीमधून फारचे चांगले रिटर्न्स येत नाहीत. ऊस व साखर मंडळाचे संचालक बोनथिन कोटसिरी म्हणाले, ‘उसाची अशी किंमत होणार असेल तर, शेतकऱ्यांना यातून काहीच मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळतील. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली तर, ऊस आणि साखरेच्या उत्पादनात घट होत असल्याचे कल आपल्याला दिसतो.’
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.