सातारा : सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पाण्याची कमतरता असलेल्या परिसरात ऊस वाळू लागले आहेत. याचा परिणाम साखर उताऱ्यावर झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील १६ कारखान्यांकडून ६० लाख ९२ हजार ३०१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ९.७७ उताऱ्यानुसार ५९ लाख ५४ हजार ३५६ क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. जिल्ह्यात साखर उताऱ्यात खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी साखर कारखाने आघाडीवर आहेत.
नऊ सहकारी कारखान्यांनी ३१ लाख ११ हजार १६० टन उसाचे गाळप करुन ३३ लाख ७३ हजार ८७० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. तर साखर सरासरी १०.८४ टक्के आहे. खासगी सात कारखान्यांनी २९ लाख ८१ हजार १४१ टन उसाचे गाळप करून २५ लाख ८० हजार ४८७ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांचा साखर उतारा ८.६६ टक्के आहे. अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते म्हणाले की, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांची ऊस तोडणीसाठी लगबग सुरू आहे. मात्र, ऊस उत्पादकांनी ऊस तोडणीसाठी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.