नवी दिल्ली : चीनी मंडी
स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी यासह इतर अनेक मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीवर मोर्चा काढला आहे. या मोर्चाला आज दिल्ली- उत्तर प्रदेश सीमेवर रोखण्यात आले आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला असून, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारेही सोडण्यात आले. अहिंसेची शिकवण देणारे महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिवशीच शेतकऱ्यांवर बळाचा वापर झाल्याने त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय तसेच उत्तर प्रदेशचे मंत्री शेतकऱ्यांच्या नेत्यांना भेटून चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
भारतीय किसान युनियनने उत्तर प्रदेशातून या ‘किसान क्रांती यात्रा’ मोर्चाचे आयोजन केले आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी करावी आणि विजेचे दर कमी करावेत, अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतकर संघटनांनी मोर्चा काढला आहे. २३ सप्टेंबरला हरिद्धारमधून शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली. काल (सोमवार, १ ऑक्टोबर) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी मोर्चा दिल्लीच्या दिशेने वळवला. या मोर्चात ५० हजारहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत.
राजघाट येते गांधी जयंती दिवशीच मोर्चाचा समारोप करण्याचे नियोजन होते. पण, मंगळवारी दिल्लीच्या सीमेवर मोर्चा पोहोचल्यानंतर दिल्लीत प्रवेश न देण्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली. पोलिसांबरोबरच निमलष्करी दलाच्या तुकड्या, मोर्चारोखण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मोर्चाला रोखल्यानंतर आक्रमक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.शेतकऱ्यांवर पाण्याचा माराही करण्यात आला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.