छत्रपती संभाजीनगर : सध्या जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांच्या बेशिस्तपणामुळे अपघातात वाढ झाली आहे. नियमांचे उल्लंघन करून उसाची वाहतूक करणाऱ्या चालकांवर आरटीओने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कारखाना प्रशासनाचेही अशा वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ट्रॅक्टरचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्यामुळे ही ऊस वाहतूक जीवघेणी ठरत आहे.
ऊस भरुन नेणारा अथवा रिकामा टॅक्टर रस्त्याच्या मधोमध चालवला जातो. त्यातून इतर वाहनांना ये-जा करण्यास अडथळे येत आहेत. याशिवाय ट्रॅक्टर रस्त्याकडेला कोठेही थांबलेले असतात. अशावेळी इतरांनी वाहतूक कशी करावी याचा विचार केला जात नाही. अनेकदा ट्रॅक्टर थांबविण्यासाठी चाकांखाली मोठे दगड लावले जातात. मात्र, ट्रॅक्टर तेथून काढल्यावरही ते रस्त्यातच ठेवले जातात. त्याचा रात्री इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. ट्रॅक्टर चालक स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणे लावतात. त्याचा नागरिकांना नेहमीच त्रास होतो. हा प्रवाशांच्या जिवाशी खेळ झाला आहे. जिल्ह्यात ऊसतोड सुरु असताना ही वाहतूक म्हणजे मोठी समस्या बनली आहे. ऊस वाहतुकीच्या वाहनांना धडकून अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे या वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी करण्यात येत आहे.