कोल्हापूर : इतर अवजड वाहनांप्रमाणेच ऊस वाहतूक करणारी वाहने विशेषतः ट्रॅक्टर ओव्हर लोडिंग आणि विना रिफ्लेक्टर वाहतूक करीत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे. सध्या ऊस तोडणी हंगाम जोमात आहे. रस्त्यावर ऊस वाहून नेणाऱ्या विनारिफ्लेक्टर लावलेल्या ट्रॅक्टर्सची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक अन्य वाहनचालकांच्या जीवावर बेतत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
साखर कारखाने ऊस वाहतुकीला ट्रॅक्टर्सना प्राधान्य देतात. उसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्टर मालकाला कारखान्याकडून भाडे मिळते. त्यामुळे ट्रॅक्टरचालक क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. अनेकवेळा उस वाहतुकीसाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर केला जातो. एका ट्रॉलीची क्षमता १४ टन इतकी असते. परंतु, यामध्ये १८ ते २० टन भरण्यात येतो. वाहनचालकांना वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली जात नाही. साखर प्रशासनाचे वचक ट्रॅक्टर चालकांवर नसल्याने बेफिकिरीने बेकायदेशीर ऊस वाहतूक केली जाते. सद्यस्थितीत ऊस वाहतुकीच्या वाहनांना सेवा रस्ता सक्तीचा करावा, विना रिफ्लेक्टर वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, रात्री ऊस वाहतूक बंदीचा विचार व्हावा, ऊस वाहतुकीसह इतर वाहने पार्किंगला बंधने घालावीत, हॉटेलजवळील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करावी, अशा मागण्या केल्या जात आहेत.