कोल्हापूर : ऊस रोपवाटिकांमध्ये सध्या लगबग सुरू आहे. यंदा वैविध्यपूर्ण वाणांच्या रोपांना चांगली मागणी आहे. रोपांना महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशमधूनही मागणी वाढत आहे. जिल्ह्यातील रोपवाटिकांमधून देशभरामध्ये ऊस रोपे जातात. साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ऊस तोडणी वेगात सुरू झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोप लावणीला पसंती दिल्याचे चित्र आहे. विशेष करुन महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश मध्ये रोपवाटिकांना चांगली मागणी असते.
गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांमध्ये वाण बदलाची मानसिकता होत आहे. विद्यापीठांनी, संशोधन संस्थांनी अनेक वाणांचे मिश्रण करुन नव्या जातीचे वाण विकसित केले आहेत. राज्यात विविध ठिकाणी ८६०३२, २६५ आदी ऊस वाण दोन वर्षांपर्यंत सर्वाधिक विक्री होणारे वाण होते. आता नव्या वाणांना पसंती मिळत आहे. सद्यस्थितीत ५०१२, १८१२१, २६५, १३३७४, १३४३६ या वाणांना राज्यातून मागणी आहे. मध्य प्रदेशात ८००५ तर गुजरातमध्ये २६५ वाणाला अधिक मागणी आहे असे जांभळी येथील रोपवाटिका चालक प्रल्हाद पवार यांनी सांगितले.