परभणी : लक्ष्मी नृसिंह शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी (ता. ३) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे कारखान्याचे गाळप करण्यासाठी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. कारखान्याचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार होता. मात्र, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास बाबर व हनुमान चांगभले यांच्यासह जमावाने कारखान्याच्या सरव्यवस्थापकांना मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त पुरवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार आंदोलकांनी अधिकारी व कर्मचारी, कामगारांना प्रवेशद्वाराबाहेर काढून कामकाज बंद केले आहे. पूर्वसूचना न देता कारखान्यास बुधवारी एक निवेदन देवून ठिया आंदोलन कारखान्याच्या प्रवेशाद्वारा आत सुरु केले आहे. यावरही आक्षेप घेण्यात आला आहे.
कारखान्याची गेल्या हंगामात २२९५.६३ रुपये एफआरपी मंजूर झाली आहे. यात पहिला हप्ता २२०० रुपये व दुसरा हप्ता १०० रुपये असे २३०० रुपये दिले आहेत. यंदासाठी २५०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे सर्व कामगार हजर असताना त्यांना ठिय्या आंदोलनामुळे कारखान्यास वेळेत उस गाळप सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे उसाचे गाळप होण्यास अडचणी होत आहे. तोडणी झालेला शेतकऱ्यांचा ऊस जागेवर वाळत आहे. ठिय्या आंदोलन तत्काळ थांबवण्यासाठी संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी निवेदनातून केली आहे.