यंत्रावरील ऊसतोडणीसाठी राज्यात एकसमान दर देण्याची मागणी

पुणे : राज्यात यंत्रावरील ऊसतोडणीसाठी एकसमान दर देण्यात यावा, अशी मागणी राज्य ऊसतोडणी मशीन मालक संघटनेतर्फे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. संघटनेतर्फे दावा करण्यात आला कि, राज्यात नुकत्याच झालेल्या २०२२ – २०२३ गळीत हंगामात मशिनद्वारे ऊसतोडणीस प्रति टन ३६० ते ४२० रुपये दर दिला आहे. तर सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि फलटण येथील दत्त इंडिया कारखान्याने प्रति टन ५१० रुपये दर दिलेला आहे. त्यामुळे राज्यात एकसमान दर देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष उमेशचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन दिले. पाटील म्हणाले, उसतोडणी मशिनच्या सहायाने तोडणी केलेल्या उसाच्या वजनात साखर कारखाने ४.५ टक्क्यांपर्यंत वजन कपात करतात. ही कपात ऊसतोडणी मशिन व्यावसायिकांवर अन्याय करणारी आहे. ही कपात 2 टक्के करावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ऊसतोडणी मशिनचालक व मालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात संघटनेचे सचिव घनश्याम मारकड, निलेश भुसे, अविनाश सावंत, ज्ञानोबा पाटील, शांतगोंडा पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here