कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक, कामगार, सभासदांना ज्याप्रमाणे बंद पडलेला दौलत साखर कारखाना सुरु करुन दिलासा दिला, त्याचप्रमाणे गोडसाखर कारखाना पुन्हा सुरू करुन ऊस उत्पादक, शेतकरी, कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी ‘गोडसाखर’चे माजी संचालक बी. एम. पाटील यांच्यासह पूर्व भागातील, नेसरी मतदारसंघातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मानसिंग खोराटे यांच्याकडे केली. मात्र, अथर्व-दौलत उद्योग समुहाचे प्रमुख मानसिंग खोराटे यांनी या हंगामात कारखाना चालविण्यास घेणे शक्य नसून पुढील हंगामात याचा विचार करू, असे सांगितले.
याबाबत बी. एम. पाटील यांनी सांगितले की, चंदगड विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी दोन्ही कारखाने सुरळीत असणे गरजेचे आहे. कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक व कामगारांचे जीवनमान उंचावल्याखेरीज मतदार संघातील विकासाला कोणतीच दिशा मिळणार नाही. दौलतच्या माध्यमातून मानसिंग खोराटे यांनी विकास केला आहे. आता गोडसाखरच्या माध्यमातून गडहिंग्लजचा विकास हाती घ्यावा. दरम्यान, खोराटे यांनी आताच्या हंगामाला प्रशासनाला आवश्यक ती मदत नक्की करेन असे आश्वासन दिले. यावेळी नेसरी जि. प. मतदारसंघातील राजवर्धन शिंदे, कृष्णराव वाईंगडे, संजय पाटील, संजय टिक्का, दयानंद पाटील, संजय पाटील, सुभाष वाईंगडे, शिवराज देसाई आदी उपस्थित होते.