अमरोहा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची भाकियूच्या पंचायतीत मागणी

अमरोहा : बसपा सरकारच्या कार्यकाळात विकलेल्या अमरोहा सहकारी साखर कारखान्यात येत्या हंगामापासून गाळप सुरू करण्याची मागणी भारतीय किसान युनियनच्या शंकर गटाच्यावतीने आयोजित पंचायतीमध्ये करण्यात आली. यासोबतच पंचायतीला जिल्ह्याचा दर्जा मिळून २५ वर्षे उलटली तरी अमरोहा विकास प्राधिकरणाची स्थापना झाली नसल्याबद्दल चर्चा करण्यात आली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विभागातील शेतकऱ्यांच्या या पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आगामी गळीत हंगामासाठी उसाच्या आधारभूत दरात ४५० रुपये प्रती क्विंटल वाढ करावी, अमरोहा येथील बंद पडलेला साखर कारखाना सुरू करावा अशी मागणी करण्यात आली. अमरोहा विकास प्राधिकरण व जिल्हा सहकारी बँकेचे स्वतंत्र मंडळ सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष दिवाकर सिंह यांनी सांगितले की, राज्य सरकारने एक एप्रिलनंतर शेतकऱ्यांच्या विंधनविहीरींची मोफत वीज आणि घरगुती वीज मिटरचे बिल बनविण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. मात्र, यासंदर्भात आदेश जारी करण्यात आलेला नाही. ग्रामीण भागात ४० टक्के ग्राहकांची बिले दुप्पट आली आहेत. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी पंचायतीत करण्यात आली. भाकियू शंकर गटाचे जिल्हाध्यक्ष सत्यपाल सिंग, धर्मवीर सिंग, राज चौधरी, अस्मिना, शेरसिंग राणा, सदकत हुसेन, चंद्रशेखर सिंग, नामपाल सिंग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here