कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू केल्याचे चित्र आहे. खुशाली देण्याच्या नावाखाली पैशांची वसुली केली जात आहे. एकरी ३ ते ५ हजार रुपयांची मागणी मजूर करीत आहेत. सद्यस्थितीत गळीत हंगाम मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढू लागले आहे. तोडणी मजुरांअभावी अनेक शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शेतातच आहे. आपला ऊस लवकर तोडला जावा यासाठी शेतकरी कारखान्याचे कार्यालयाचे हेलपाटे मारून वैतागले आहेत.
काही तोडणी मजुरांनी एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी सुरू केली आहे. त्यामुळे तोडलेला ऊस तब्बल ४ ते ५ दिवस शेतातच पडून राहू लागला आहे. चार महिने लोटले तरी अद्यापही हंगाम सुरूच आहे. अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील २५ ते ३५ टक्के ऊस शेतातच आहे. ऊस वाहतूक करणारे वाहनधारक व खुद्दतोडणी मजुरांनी आपापल्या शेतातील ऊस तोडणीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ऊस अद्यापही शेतातच पडून आहे. मशिनद्वारे ऊस तोडणीसाठीही एकरी ४ ते ५ हजार रुपयांची मागणी केली जात आहे.