सांगली : सध्या सर्वच कारखान्यांचा ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे गावोगावी ऊस तोडणीची लगबग सुरू आहे. कारखाना नोंदीप्रमाणे ऊस कारखान्यांकडे गाळपासाठी नेण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र तोडणी मजुरांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होऊ असल्याचे चित्र तालुक्यातील प्रत्येक लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मजुरांकडून शेवटच्या टप्प्यातील उसाला ५ ते ७ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची मागणी केली जात आहे.
कडेगाव तालुक्यात सध्या १५ ते २० टक्के ऊस शिल्लक आहे. सद्यस्थितीत उन्हाच्या तीव्रतेमुळे ऊस वाळू लागला आहे. ऊस कारखान्याला पाठवण्याच्या प्रक्रियेत उत्पादक शेतकरी भरडून निघाला आहे. सध्या बहुतांश कारखान्यांकडे तोडणी मजुरांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे काही ठिकाणी मालकांकडून फड पेटवूनच तोडणी केली जात असल्याचे दिसत आहे. ऊस पेटवूनही मजुरांकडून अव्वाच्या सव्वा मागणी केली जात आहे. मात्र अशा प्रकारांकडे कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे तोडणी मजुरांचे फावले आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे तोडणी मजुरांनाही काम करणे अवघड होऊन बसले आहे. कारखाना कर्मचारी व शेतकरी यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत.