हापुड : रसुलपूर आणि फतेहपूर येथील शेतकऱ्यांनी ऊस खरेदी केंद्र बदलण्याची मागणीचे निवेदन ऊस समितीच्या सचिवांना सादर केले. यामध्ये सिंभावली कारखान्याच्या व्यवस्थापनावर ऊस बिले देण्यास उशीर केला जात असल्याचे आरोप करण्यात आला आहे. कारखान्याला यंदा ऊस पाठवला जाणार नाही असे सांगत शेतकऱ्यांनी केंद्र बदलून द्यावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला. सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावात साखर कारखान्याची दोन केंद्र आहेत. या केंद्रांशी संलग्न शेतकरी सिंभावली कारखान्याच्या चुकीच्या प्रणालीमुळे त्रस्त आहेत. कारखाना प्रशासन भ्रष्ट आहे. त्यामुळे येथे ऊस पाठवणे सुरक्षित वाटत नाही.
अमर उजालामधील वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, ऊस स्वीकारणे, तोडणी पावतीस उशीर, वजनातील घोळ अशातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. इतर जिल्ह्यांत कारखान्यांनी हंगाम २०२१-२२ मधील सर्व बिले दिली आहेत. मात्र, सिंभावली कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ४० टक्के पैसे थकीत आहेत. त्यामुळे आम्हाला सिंभावली कारखान्याचे केंद्र हटवून नंगलामल, अगौता, साबितगढ या कारखान्यांची केंद्रे द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी नली हुसैनपूर गावातील शेतकऱ्यांनीही कारखान्याला ऊस देण्यास नकार दिला होता.