धाराशिव : तेरणा बचाव संघर्ष समितीसह शेतकरी सभासदांनी बुधवारी (दि. २१) जिल्हा बँकेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना व कारखान्याची जमीन विक्री करु नये, अशा मागणीचे निवेदन बँकेच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आले. मागील कांही दिवसापासून कारखाना व जमीन विक्री करण्याच्या डिसीसी बँकेच्या हालचाली सुरू आहेत असा आरोप तेरणा बचाव संघर्ष समितीसह शेतकरी सभासदांनी केला आहे.
बुधवारी तेरणा बचाव संघर्ष समितीसह शेतकरी सभासदांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा बँक व अवसायक यांच्याकडून तेरणा कारखाना व जमीन विक्री करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप केला. डीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर तेरणा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणा देत हलगीचा खणखणाट केला. कारखान्याचे अवसायक विजय घोणसे यांना निवेदन देण्यात आले. कार्यकारी संचालक घोणसे यांनी बँकेच्या पुढील होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपले निवेदन सादर करण्यात येईल व संचालक मंडळाचा निर्णय आपणास अवगत केला जाईल असे लेखी दिले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.