पुणे :माळेगाव कारखान्याच्या मागील ३० सप्टेंबर २०२३ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणाचा विषय चर्चेला मांडला होता. यामध्ये सत्ताधारी संचालक मंडळाने २४० केएलपीडीच्या प्रकल्पाबाबत आग्रह धरला होता, तर आम्ही ५०० केएलपीडीच्या प्रकल्पाबाबत आग्रही होतो. त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याच्या इथेनॉल विस्तारीकरण प्रकल्पाबाबत सत्ताधारी संचालक मंडळाने ठरल्याप्रमाणे विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे व रंजन तावरे, अॅड. जी. बी. गावडे यांनी केली आहे. शुक्रवारी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या मागणीचे पत्र दिले आहे.
‘व्हीएसआय’चे अधिकारी व सभासद यांच्यासमोर चर्चा करून इथेनॉल विस्तारीकरण प्रकल्पाला मान्यता घ्यावी, अशी मागणी तावरे, गावडे यांनी केली आहे. याबाबत, तावरे यांनी सांगितले की, माळेगाव कारखान्याचा इथेनॉल विस्तारीकरणाचा प्रकल्प सुरू करण्याअगोदर मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरल्यानुसार विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी. प्रकल्पाबाबत सविस्तरपणे चर्चा करून, सभेची मान्यता घेऊन कारखान्यासाठी फायदेशीर असणारा प्रकल्प सुरू करावा अशी मागणी त्यांची आहे.
इथेनॉल इंडस्ट्रीच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचणे सुरू ठेवा