सांगली : जागतिक बाजारपेठेत साखर प्रति किलो ३५ रुपयांपेक्षा जास्त दराने विकली जात आहे. इथेनॉल आणि वीज विक्रीतूनही कारखान्यांची चांगली कमाई होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० रुपये अदा करावेत. अन्यथा, यावर्षी हंगामात साखर कारखान्याची धुराडे पेटून देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
बावची (ता. वाळवा, जि. सांगली) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित जाहीर सभेत शेट्टी बोलत होते. यावेळी जगन्नाथ भोसले, महेश खराडे, पोपट मोरे, भागवत जाधव, संजय बेले, संदीप राजोबा, सचिन यादव, गणी मुल्ला, विलास यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशव कारखान्यांनी एकरकमी एफआरपी अदा केली आहे. गळीत हंगाम सुरू झाला होता तेव्हा साखरेचा भाव ३१ रुपये होता. आता ३८००ते ३९०० रुपये क्विंटल झाला असून सरासरी साखरेचा भाव ३६०० रुपये क्विंटल गृहित धरला तरी साखर कारखान्याला सहाशे ते सातशे रुपये जादा मिळत आहेत. त्यामुळे साखर कारखाने प्रति टन ४०० रुपये देऊ शकतात, असा दावाही शेट्टी यांनी केला.