पुणे : उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) काढताना साखरेचा मूळ उतारा ९ टक्के धरून प्रती टनास ३,६५० रुपये दर देण्याची मागणी शरद जोशी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी केली आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये या दराची कार्यवाही करावी, अन्यथा यंदाचा हंगाम सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. शेतकरी संघटनेतर्फे देशभर ४ सप्टेंबरपासून आसूड मोर्चा आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
विठ्ठल पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह विविध मंत्री आणि सचिवांनाही निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, साखरेची किमान विक्री किंमत ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात यावी. केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमतीचा कायदा लागू करावा आणि कृषी विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करावा. सरकारने २०२४- २५ साठी १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी उसाला ३,४०० रुपये टन दर जाहीर केला आहे, तो ऊस उत्पादकांवर अन्यायकारक आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.