कोल्हापूर : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर चालवण्यास द्यावा, कारखान्याने संस्थांच्या ठेवी, तोडणी वाहतूक बिले देण्याची मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्याकडे केली आहे. शनिवार (दि. १८) होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत कारखाना चालवण्यास देण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. पण कारखाना चालवयाला देणे म्हणजे सभासद आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांना सुरळीतपणे चालवता न आल्याने हा कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, शिवाजी माने, राम वळतकर, विकास पाटील, सतीश पाटील, बसवराज बंदी, शिवाजी राऊत, राजेंद्र कोरी आदींच्या सह्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संचालक मंडळाने गेल्या हंगामात कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना बंद ठेवला. यंदा कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेने ५५ कोटी रुपयांचे कर्ज दिले. साखर निर्यात अनुदान, मोलॅसिस व स्क्रॅप विक्रीतून ६० कोटी रुपयांचे भांडवल मिळूनही कारखाना सुरळीत चालवता आलेला नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्व संचालकांनी राजीनामा देऊन हा कारखाना सहकार तत्त्वावर चालवण्यासाठी सभासदांकडेच द्यावा, असे म्हटले आहे.