नागपूर : घोडगंगा सहकारी साखर कारखाना तसेच यशवंत सहकारी साखर कारखाना बंद असल्याने शिरूर- हवेली मतदारसंघातील शेतकऱ्यांचा हजारो टन ऊस गाळपाअभावी दरवर्षी पडून राहतो. शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरू करावेत. या कारखान्यांसाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर (बाबा) कटके यांनी केली आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चासत्रात आमदार कटके यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आवाज उठवला.
आमदार कटके म्हणाले की, बंद कारखाने सुरू करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी. घोडगंगा कारखान्याचे अकार्यक्षम संचालक मंडळ बरखास्त करावे. यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी. शिरूर हवेली मतदारसंघात रोहित्रांची संख्या कमी असल्याने यावर भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. महावितरणने गेल्या वर्षभरात १८८ पेक्षा जास्त रोहित्र चोरीला गेले आहेत, त्याची नोंद घेऊन शेतकऱ्यांना नवीन रोहित्र उपलब्ध करून द्यावेत.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.