कोल्हापूर : नोव्हेंबर महिना संपत आला तरी तालुक्यातील हरळी खुर्द येथील आप्पासाहेब नलवडे तालुका सहकारी साखर कारखान्याचा (गोडसाखर) अजून बॉयलर पेटलेला नाही. कारखाना कार्यक्षेत्रात १० ते १२ लाख टन ऊस उपलब्ध आहे. कारखाना तत्काळ सुरू करण्याची मागणी जनता दलाने केली आहे. पक्षाच्यावतीने कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालकांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, अमर चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखाना कार्यक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांचा चरितार्थ ऊस शेतीवर अवलंबून आहे. कारखाना सुरू झाला नाही तर येथील ऊस अन्य कारखान्यांना जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०२१ – २०२२ मध्ये वित्तीय संस्थांनी अर्थसहाय्य दिले नव्हते. तेव्हा तत्कालीन अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांनी तालुक्यातील हितचिंतक संस्थांकडून चार कोटींच्या ठेवी उपलब्ध करून गळीत हंगाम सुरू केला होता. याशिवाय उसाची बिले, कामगारांचा पगार व तोडणी -ओढणीची बिले अदा केली होती.
सन २०२३-२४ मध्ये कारखाना चालू होण्यासाठी बँकांकडून ५५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तरीही कारखाना सुरू झाला नाही. कारखान्याचा पंचवार्षिक निवडणुकीनंतरचा गळीत हंगाम कोणत्याही सभासदांना व कामगारांना न सांगता व विश्वासात न घेता बंद ठेवण्यात आला. तातडीने गळीत हंगाम सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.