नजीबाबाद : भारतीय किसान युनियनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध अडचणी उपस्थित केल्या. त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करण्याचे ठरले. बैठकीस उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करावेत, अशी मागणी केली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ड्वाकरा हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भाकियूच्या मासिक बैठकीत तालुका अध्यक्ष दिनेश कुमार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. ते म्हणाले की, शेतकरी विविध कारणांनी अडचणीत आले आहेत. अद्याप शंभर टक्के ऊस बिले मिळालेली नाहीत. मोकाट जनावरांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय लम्पी स्कीन रोगामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. भाकियूचे जिल्हा महासचिव नरदेव सिंह म्हणाले की, जर या समस्यांची सोडवणूक लवकर झाली नाही, तर शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येईल. बैठकीत साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. विंधन विहिरींतून मोफत पाणी द्यावे, लम्पी रोगापासून बचावासाठी जनावरांचे लसीकरण करावे, आगामी गळीत हंगामापूर्वी ऊस दरवाढ द्यावी, आदी मागण्या केल्या. तालुका उपाध्यक्ष विजेंद्र सिंह यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस संजीव कुमार, सौरभ कुमार, हुकूम सिंह, रामगोपाल, विजेंद्र सिंह, राजेंद्र सिंह, महेंद्र सिंह, सुनील कुमार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.