पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मारक असणारी दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, उसाची थकीत बिले आणि कामगारांचे थकीत वेतन तत्काळ द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत केली.
रघुनाथदादा पाटील यांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी पाटील म्हणाले कि, राज्यातील ८४ कारखान्यांनी अद्याप संपूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्या कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) कारवाई करून शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह रक्कम वसूल करून द्यावी, उसाची काटामारी रोखण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे वजन बाहेरच्याही वजन काट्यावर करून ते कारखान्यांनी ग्राह्य धरावे, अशी मागणी केली. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बिलातून गोपीनाथ मुंडे महामंडळाची प्रती टन १० रुपये होणारी कपात रद्द करावी, अशी मागणीही केली.
साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले कि, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे. शेतकरी संघटनेने केलेल्या मागण्यांची माहिती राज्य सरकारला कळविणार आहे. केंद्र स्तरावरही संघटनेच्या मागण्यांचा प्रस्ताव पाठविला जाईल, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी आंदोलकांना सांगितले. यावेळी साखर संचालक यशवंत गिरी, डॉ. संजयकुमार भोसले, सह संचालक मंगेश तिटकारे, राजेश सुरवसे यांच्यासह शिवाजी नांदखिले, ललिता खडके, शंकरराव मोहिते, वस्ताद दौंडकर, बाबा हरुगडे, राजेश नाईक, लक्ष्मण पाटील आदी उपस्थीत होते.