भारतातील डिमॅट खात्यांनी 17 कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL) च्या आकडेवारीनुसार, भारतातील नोंदणीकृत डिमॅट खात्यांनी 17 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.31 ऑगस्ट 2024 पर्यंत, एकूण डिमॅट खात्यांची संख्या आता 17.10 कोटी आहे.ऑगस्टमध्ये शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळाली असली तरीही सुमारे 42.3 लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या वाढीमुळे महिन्याच्या अखेरीस एकूण खाती 17.10 कोटींवर पोहोचले.प्रचंड अनिश्चितता आणि बाजारातील चढ-उताराच्या काळातही किरकोळ गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे कल वाढत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की, 9.7 कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदारांपैकी केवळ 1.5 कोटी सक्रिय आहेत. तथापि, अहवालात असे दिसून आले आहे की NSE वरील सक्रिय गुंतवणूकदारांची संख्या महिन्या-दर-महिन्यानुसार 13.9 टक्क्यांनी वाढून जूनमध्ये 1.5 कोटींवर पोहोचली आहे. NSE अहवालाने असेही सुचवले आहे की महिन्यातून किमान एकदा व्यापार करणाऱ्या व्यक्तींची संख्या मेच्या तुलनेत जूनमध्ये 13.1 टक्क्यांनी वाढली, जे बाजारातील सहभागातील मजबूत कल दर्शवते. जूनमध्ये किमान एकदा व्यापार करणाऱ्या वैयक्तिक गुंतवणूकदारांची संख्या सर्व प्रदेशांमध्ये वाढली आहे. जूनपर्यंत, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि हरियाणा या शीर्ष 10 राज्यांमधून NSE वर सक्रिय देशांतर्गत बाजार गुंतवणूकदारांची संख्या 1.2 कोटी होती. जूनमध्ये महाराष्ट्राने शेअर बाजारातील नवीन आणि सक्रिय गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here