निदर्शनांच्या माध्यमातून बीकेयूच्या दोन गटात शक्तिप्रदर्शन

मेरठ : राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या भारतीय किसान युनियनच्या (बिकेयू) निदर्शनानंतर दोनच दिवसांनी यापासून स्वतंत्र झालेल्या बीकेयू-अराजकीयचे सदस्य हजारोंच्या संख्येने मेरठ आयुक्त कार्यालय पार्कमध्ये एकत्र आले. मेरठमध्ये निदर्शनांच्या माध्यमातून बिकेयूच्या दोन्ही गटांचे शक्तीप्रदर्शन दिसून आले.

दोन्ही घटकांनी सरकारच्या प्रतिकूल धोरणे, एमएसपी कायद्यासारख्या ज्वलंत मुद्यांवर आणि उसाच्या दरात सुधारणा करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषावर चर्चा कली. मात्र, दुसरीकडे दोन्ही आघाड्यांकडून शेतकरी संघटनेच्या रुपात आपणच प्रभावी असल्याचे सांगण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. नव्या गटाने युपीच्या १२ जिल्ह्यांदरम्यान, प्रयागराजमध्येही समर्थकांना आणण्याचे काम केले.

बिकेयू अराजकीयचे राष्ट्रीय प्रवक्ते धर्मेंद्र मलिक यांनी सांगितले की, या वर्षी जानेवारीच्या अखेरीस प्रयागराजमध्ये आमचे राष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. आम्ही १५ मार्च रोजी मेरठमध्ये किसान पंचायत आयोजित करण्याची घोषणा त्यावेळी केली. मात्र, बिकेयूने सांगितले पाहिजे की, त्यांनी १० मार्च रोजी आपली पंचायत का आयोजित केली? दरम्यान, बिकेयूचे प्रसार माध्यम प्रवक्ते अर्जुन बालियान यांनी या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, आम्ही एक पंचायत फेब्रुवारीमध्ये केली होती. त्यामध्येच मेरठ येथील पंचायतीची घोषणा केली होती. बिकेयूच्या पंचायतीसाठी कोणतीही नवीन बाब नाही. आम्ही देशाच्या विविध भागात पंचायत आयोजित करीत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here