बलरामपूर : भारतीय किसान क्रांती युनियनने वाढती महागाई आणि उसाची थकबाकी याप्रश्नी निदर्शने केली. महागाईला आळा घालावा आणि उसाचे पैसे तातडीने मिळावेत यासाठी उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
भारतीय किसान क्रांती युनीयनचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद खलील शाह यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. महागाईमुळे गरीब, श्रीमंत अशा सर्वच वर्गाला मोठा फटका बसल्याचे जिल्हाध्यक्ष शाह यांनी सांगितले. डिझेल, पेट्रोलने शंभरी गाठली आहे. गॅस एक हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. धान्याचे दरही दुप्पट झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी महागाईच दुप्पट झाली आहे असे त्यांनी सांगितले.
इटईमैदा येथील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बजाज साखर कारखान्याने थकवले आहेत. हे शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळविण्यासाठी भारतीय किसान क्रांती युनीयन आरपारची लढाई करेल असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा महासचिव बच्छराज वर्मा, बेलाल पांडे, सत्य राम यादव, अंकुश पांडेय, राधेश्याम पांडे, रामपाल यादव, राम उजागर, शिव कुमार, श्रीचंद्र, राम विलास, भीम राजभर, संजय कुमार व मोतीलाल आदींची भाषणे झाली.