कोल्हापूर : हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा बगॅसवर आधारित प्रक्रिया करून उत्पादन निर्मिती त्वरित सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन कारखान्याच्या सभासदांनी जिल्हा बँकेकडे केली आहे. केडीसीसी बँक बोर्ड व ‘दौलत’च्या सध्याच्या मुदत संपलेल्या संचालक मंडळाने याविषयी पुढाकार घ्यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सतीश सबनीस, अशोक मोहिते, रमेश झाजरी आदींनी केली आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा बँकेने दौलत साखर कारखाना मद्यार्क निर्मितीचा डिस्टलरी प्रकल्प व पार्टिकल बोर्ड आपल्या ताब्यात घेऊन कर्जासाठी ३९ वर्षांच्या कराराने साखर कारखाना व डिस्टिलरी प्रकल्प चार वर्षांपूर्वी अथर्व कंपनीकडे दिला. एनसीडीसीचे कर्ज असलेला पार्टिकल बोर्ड सध्याच्या संचालक मंडळाच्या मान्यतेनेही आपल्याकडेच घेतला. पण, हा प्रकल्प बंद पडलेला आहे. त्याचे व्याज जिल्हा बँक सभासदांकडून वसूल करीत आहे. पार्टिकल बोर्डाचे कर्ज १०० कोटींवर झाले आहे. बँकेने पार्टिकल बोर्ड चालू करावा; अन्यथा सभासद आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, कारखान्याची निवडणूक घ्यावी, अशी मागणीही सभासदांनी केली आहे.