आर्थिक संकट, महागाईचा तडाखा आणि राजकीय अस्थिरतेत गुरफटलेल्या पाकिस्तानसमोर आणखी एक आव्हान समोर उभे राहिले आहे. इतिहासात पहिल्यांदा पाकिस्तानचा रुपया सर्वात निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. आणि याची किंमत ३०० च्या स्तरावर पोहोचली. गुरुवारी बाजार खुला होताच युएस डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलन ३०१ रुपयांवर पोहोचले. तर आंतरबँक परकीय चलन विनिमय बाजारात एक डॉलरचा दजर २९९ रुपये नोंदविण्यात आला.
आजकतने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान फॉरेक्स एक्सचेंज असोसिएशनचे जफर बोस्तान यांनी पाकिस्तानी रुपयाने प्रती डॉलर ३०० रुपयांची पातळी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, देशाच्या चलनात झालेली ही घसरण हे आधीच सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या काळात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर कसा विपरीत परिणाम होत आहे याचे उदाहरण आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानची सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे. देश प्रचंड कर्जाखाली दबला गेला आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने पाकिस्तानच्या दिवाळखोरीचा इशारा दिला आहे. परकीय चलन साठा ४.५ अब्ज डॉलरच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. देश सध्या फक्त एक महिना आयात करण्यास सक्षम आहे.